शीवच्या मराठी शाळेत राज्यातील पहिले इनोव्हेशन सेंटर

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाचे केवळ पुस्तकी धडे देऊन त्यांच्यात विज्ञान-तंत्रज्ञानाची गोडी निर्माण होणार नाही, नव्या युगातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी त्यांना इनोव्हेटिव्ह म्हणजे नावीन्यपूर्ण पद्धतीने विचार करता यावा, या हेतूने इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याचा मान सायनच्या शीव शिक्षण संस्थेने मिळवला आहे. राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच सेंटर आहे. धारावी, चुनाभट्टी येथील कष्टकरी घरांतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आयओटी आणि थ्री-डी प्रिंटिंग यांसारख्या वैज्ञानिक विषयांची अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात सायनच्या शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलला यश आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे प्रयोग पहिले इनोव्हेशन सेंटर करता येतील, अशा सुसज्ज इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन सोमवारी ख्यातनाम गायक शंकर महादेवन आणि लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरजित सिंग तलवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान आणि ग्रॉक लर्निंगचे नितीन कोमावर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या इनोव्हेशन सेंटरच्या उभारणीसाठी रोटरी क्लव या सेवाभावी संस्थेने शाळेला दहा लाखांचे आर्थिक सहकार्य केले आहे. इयत्ता सहावी, सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना या इनोव्हेशन सेंटरमध्ये रोबोटिक्स, आयओटी आणि थ्री-डी प्रिंटिंगचे प्रयोग करता येतील, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. या इनोव्हेशन सेंटरमुळे विज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि तंत्रज्ञान यामधील संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट तर होतीलच, पण त्याआधारे नवनवीन उपकरणे, मशिन्स बनवण्यासाठी प्रयोग करण्याची प्रेरणा त्यांना मिळेल, असे कोमावार यांनी सांगितले.